प्रस्तावना
मी नुकतीच कायद्याची पदवी प्राप्त केली होती आणि जगातील एका सर्वात प्रतिष्ठित वकिली फर्ममधून मला नोकरीसाठी अतिशय आकर्षक प्रस्ताव आला होता. अतिशय चमकदार आणि वैभवशाली अशा करिअरपासून मी केवळ एका स्वाक्षरीच्या अंतरावर होतो आणि तरी देखील ती स्वाक्षरी करायची नाही असा निर्णय मी घेतला.
माझं विचारचक्र सुरू झालं होतंः मला आयुष्याकडून नक्की काय हवं होतं? माझं ध्येय काय होतं? मला साजेशी नोकरी शोधण्यासाठी मी कित्येक महिने घालवले होते, पण एखाद्या प्रतिष्ठित वकिली फर्ममध्ये रूजू होणं आणि त्यांच्या वतीनं जगभर फिरत बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या व्यवहारांबद्दल सल्ले देणं हे मला आता माझ्यासाठी योग्य वाटेना कायद्याची पदवी आणि नोकरीची संधी या दोन्हीसाठी मी कसून धडपड केलेली होली तरीही. मला जाणवलं की मी भरकटलो आहे आणि माझ्या भवितव्याची चिंता वाटायला लागली. मी काय करणार होतो ? जसजसा मी अधिकाधिक चिंता करू लागलो, मला जाणवू लागलं की माझं जग हळूहळू ढासळतंय.
एका रात्री खूप उशीरा मी माझ्या शयनगृहातील अंधाराकडे टक्क डोळ्यांनी बघत होतो आणि माझ्या मनात चिंतेचा महासागर उसळला होता. झोप लागत नव्हती, म्हणून मी उठून लॅपटॉपवर काही यू ट्युब व्हिडिओज् बघावेत असं ठरवलं. त्याप्रमाणे मी ओप्रा विनफ्रे आणि एखार्ट टोल यांची ए न्यू अर्थः अवेकनिंग टू युवर लाईफ्ज्ञ पर्पज ही वेब शिकवणी सुरू केली. ऑप्राच्या एका वाक्याने एकदम माझं लक्ष पूर्णपणे खेचून घेतलं. ती म्हणाली: "आपल्या आयुष्याचं नेमकं ध्येय काय आहे, याची जाग येणं यापेक्षा आयुष्यात दुसरं काहीही महत्त्वाचं असेल असं मला वाटत नाही."
त्या गोष्टीने मला विचारात पाडले. मी ज्यातून जात होतो ते हेच होतं का? माझ्या आयुष्यातील ध्येयाला जागं करण्याचा मी प्रयत्न करत होतो का? ज्या क्षणी माझ्या मनात असा विचार आला त्याक्षणी माझ्या अंतःकरणातून एक वेगळीच ऊर्मी उमटल्याचं मला जाणवलं एक अननुभूत भावना जणू काही माझे अंतःकरण स्वतःहूनच माझ्या आतल्या प्रश्नांना प्रतिसाद देत होतं आणि आता याक्षणी मी ते ऐकावं अशी त्याची इच्छा होती.
या भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा मी माझे लक्ष पुन्हा वेब शिकवणीकडे वळविले तेव्हा टोल सांगत होते, "तुम्हाला आयुष्याकडून काय हवं आहे हे स्वतःला विचारणं चांगली गोष्ट आहे परंतु त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आयुष्याला तुमच्याकडून काय हवं आहे? तुमच्याकरता आयुष्याने काय राखून ठेवले आहे?" ते शोधून काढण्यासाठी, टोल म्हणाले की मौनाच्या क्षणांना तुमच्या आयुष्यात येऊ देणे महत्त्वाचे असते. कारण ज्याला आपण 'विचार करणे' असे म्हणतो त्या मानसिक गोंगाटापासून तुमची सुटका केवळ मौनच करू शकते.
Send as free online greeting card
Email a Friend
Visual Search
Manage Wishlist